देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने फ्रेशर्ससाठी मोठी घोषणा केली असून २०२६ पर्यंत सुमारे २१ हजार नवोदितांची भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, काही अत्याधुनिक तंत्रज्ञान भूमिकांसाठी कंपनी थेट २१ लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज देणार आहे, जे भारतीय आयटी क्षेत्रातील फ्रेशर्ससाठी अत्यंत आकर्षक मानले जात आहे.
मीडिया अहवालानुसार, २०२५ मध्ये पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिस ऑफ-कॅम्पस भरती मोहीम राबवणार आहे. या भरतीत ७ लाखांपासून २१ लाख रुपयांपर्यंत वेगवेगळ्या वेतन श्रेणी असतील. कंपनीने पदांनुसार चार वेगवेगळे सॅलरी स्लॅब निश्चित केले असून भरती प्रामुख्याने ‘स्पेशलिस्ट प्रोग्रामर’ आणि ‘डिजिटल स्पेशलिस्ट इंजिनिअर’ या पदांसाठी होणार आहे.
या भूमिकांसाठी BE, BTech, ME, MTech, MCA तसेच इंटिग्रेटेड MSc पदवीधर पात्र असतील. संगणक विज्ञान, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखांतील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
इन्फोसिसचा भर आता ‘AI-फर्स्ट’ धोरणावर असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या तंत्रज्ञानातील कुशल मनुष्यबळ आकर्षित करण्यासाठीच पगारवाढ करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सतत सुरू असलेल्या टेक क्षेत्रातील कपातीच्या पार्श्वभूमीवर, इन्फोसिसची ही मोठ्या प्रमाणावरील भरती फ्रेशर्ससाठी दिलासादायक ठरत असून आयटी क्षेत्रात नव्या आशा निर्माण करत आहे.

Comments are closed.