भारताने येत्या दशकात स्टार्टअप क्षेत्रात जागतिक नेतृत्व करावे, हेच आपले ठाम उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या सर्जनशीलतेवर आणि नवउद्योजकांवर देशाचा पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली येथे आयोजित ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, कृत्रिम प्रज्ञा (AI) आणि नवतंत्रज्ञान क्षेत्रात भारताने स्पर्धात्मक आघाडी घेणे अत्यावश्यक आहे. पुढील दहा वर्षांत अधिकाधिक नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स उभे राहून भारताने जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उद्योजक आणि संस्थापकांनी नव्या कल्पनांवर काम करताना उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करावे, तसेच उद्दिष्टपूर्तीत येणाऱ्या अडचणींवर एकत्रितपणे उपाय शोधावेत, असे आवाहन त्यांनी केले. भारतातील नवउद्योजकांमध्ये मोठी क्षमता असून त्यांच्यावर देशाचा पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी स्टार्टअप उद्योगांना संशोधन आणि उत्पादन विकासावर भर देण्याची गरज अधोरेखित केली. आजचे संशोधन उद्याची बौद्धिक संपदा ठरत असून, स्टार्टअप्सना प्रारंभिक आर्थिक बळ देण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
१६ जानेवारी २०१६ रोजी सुरू झालेल्या स्टार्टअप इंडिया मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी कार्यक्रमात सहभागी यशस्वी स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या प्रकल्पांची माहिती घेतली.

Comments are closed.