आयआयटी मुंबईत हिवाळी प्लेसमेंटची सुरुवात होताच विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा वर्षाव झाला. पहिल्याच दिवशी ‘दा व्हिन्सी’ या कंपनीने तब्बल ₹1.48 कोटींच्या पॅकेजची ऑफर देत सर्वांत मोठी प्लेसमेंट दिली. या दिवशी एकूण ४२ नामांकित कंपन्या कॅम्पसमध्ये आल्या.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी ९८ विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर मिळाल्या, तर ७० विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली. मात्र, पुढील दिवसांत अजून चांगल्या संधी मिळू शकतात म्हणून अनेकांनी ऑफर स्वीकारण्यास विलंब केला आहे.
यंदाच्या प्लेसमेंटमध्ये एआय आणि मशीन लर्निंग कौशल्यांवर कंपन्यांचा विशेष फोकस आहे. आयआयटी मुंबईनुसार, यावर्षी २३०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पात्र ठरले असून, विद्युत अभियांत्रिकी विभागातून सर्वाधिक विद्यार्थी सहभागी आहेत. प्रथमच ‘इंटर्नशिप-आधारित प्लेसमेंट’ही सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पहिल्या दिवशी फ्लिपकार्ट, जे. पी. मॉर्गन, बार्कलेज, क्वालकॉम यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. यासोबतच जीई, एअरबस, बार्कलेज यांनी वॉक-इन पद्धतीने निवड प्रक्रिया केली. दुसऱ्या दिवशीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून ३५+ कंपन्या सहभागी झाल्या. विशेष म्हणजे, एलॉन मस्कची टेस्लाही सर्वाधिक संधी देणाऱ्या कंपन्यांपैकी एक ठरणार असल्याची शक्यता आहे.
पहिल्या दिवसाच्या पॅकेजबाबत आयआयटी मुंबईने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचा माहोल आहे.

Comments are closed.