राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्चपर्यंत चालणार आहेत. पालघर जिल्ह्यातील ६९ परीक्षा केंद्रांवर २८८ शाळांमधील एकूण ५६,१३९ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

परीक्षा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात २,२४६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६९ पैकी ५४ परीक्षा केंद्रांवर १०० टक्के सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून उर्वरित १५ केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्यामुळे तेथे विशेष पथके नेमण्यात आली आहेत. तसेच सर्व केंद्रांच्या प्रवेशद्वारांवर आणि वरांड्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून ६९ रनरची नियुक्ती करण्यात आली आहे. पालघर व जव्हार तालुक्यातील प्रत्येकी एक, तर वसई तालुक्यातील तीन शाळा संवेदनशील केंद्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी कॉपी प्रकरण उघडकीस आल्याने नालासोपारा येथील ज्ञानसागर ज्युनिअर कॉलेजचे परीक्षा केंद्र यंदा रद्द करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने वसई तालुक्यात काही केंद्रांवर इतर शाळांतील विद्यार्थ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांच्या परीक्षांदरम्यान विशेष लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.