नागपूर पोलिस भरतीत उच्चशिक्षितांची झुंबड; डॉक्टर-इंजिनीअरही रिंगणात! | Highly Educated Rush for Nagpur Police!

Highly Educated Rush for Nagpur Police!

नागपूरमध्ये सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, शिक्षितांसह उच्चशिक्षित तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. शासकीय नोकरभरती नियमित होत नसल्याने तरुणांचा ओढा आता पोलिस विभागाकडे वाढताना दिसतो आहे. विशेष म्हणजे दंत शल्यचिकित्सक, एमटेक पदवीधर, एमबीए, एमसीए, एमएससी, बीई, बीटेक अशा विविध व्यावसायिक पदव्या धारण केलेले उमेदवारही पोलिस शिपाई बनण्यासाठी नशीब आजमावत आहेत. यात एमकॉम पदवीधारक तृतीयपंथीय उमेदवाराचाही समावेश असल्याने ही भरती विशेष चर्चेत आली आहे.

Highly Educated Rush for Nagpur Police!

या भरतीत बारावी शिक्षण घेतलेले तब्बल २४,७१८ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्याखालोखाल बीए, बीकॉम, बीएससी, बीई, बीटेक, बीफार्म, बीसीए, बीबीए, बीएड, एलएलबी, एमए, एमकॉम, एमएसडब्ल्यू, एमएससी, एमटेक अशा विविध शाखांतील हजारो पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार सहभागी झाले आहेत. एकूण ३६,२२२ उमेदवारांनी नागपूर शहर पोलिस दलातील ५९५ शिपाई पदांसाठी अर्ज केले असून, त्यापैकी १८० जागा महिलांसाठी राखीव आहेत.

दरम्यान, नागपूर कारागृहातील १३० शिपाई पदांसाठी तब्बल ७१,१४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, ज्यात ३९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. वाढती स्पर्धा आणि बेरोजगारीचे चित्र या भरती प्रक्रियेतून स्पष्ट होत आहे.

ही संपूर्ण भरती प्रक्रिया पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त व उपायुक्तांच्या नेतृत्वात पार पडत असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे. उच्चशिक्षित तरुणांचा वाढता सहभाग हे बदलत्या रोजगार वास्तवाचे द्योतक मानले जात आहे.

Comments are closed.