मुंबई उच्च न्यायालयांतर्गत सुरू असलेल्या मोठ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अद्याप अर्ज न केलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आता १६ जानेवारी २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेकांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
या भरती मोहिमेत एकूण २,३३१ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक लिपिक पदांच्या १,३३२ जागा, शिपाई पदाच्या ८८७ जागा, चालक पदाच्या ३७ जागा, तसेच लघुलेखक (उच्च श्रेणी) १९ आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) ५६ जागांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे.
पदांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. चालक पदासाठी दहावी उत्तीर्ण व वैध वाहनचालक परवाना आवश्यक असून शिपाई पदासाठी किमान सातवी उत्तीर्ण पात्रता अपेक्षित आहे. टायपिंग, शॉर्टहँड आणि संगणक प्रमाणपत्रे संबंधित पदांसाठी अनिवार्य असतील.
उमेदवारांचे वय ८ डिसेंबर २०२५ रोजी १८ ते ३८ वर्षांदरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार ५ वर्षांची वयोमर्यादा सूट देण्यात येणार आहे. सर्व प्रवर्गांसाठी १,००० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Comments are closed.