महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महाजेनको) अंतर्गत तंत्रज्ञ-३ पदाच्या भरती प्रक्रियेला नागपूर उच्च न्यायालयाने तात्पुरता ब्रेक लावला आहे. न्यायालयाने राज्यशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, तूर्तास कोणतेही नियुक्ती आदेश जारी करू नयेत.

महाजेनकोने मागील वर्षी तंत्रज्ञ-३ पदासाठी परीक्षा घेतली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली असली, तरीही अंतिम निवड यादी तयार करणे आणि नियुक्ती आदेश देणे बाकी आहे.
या प्रक्रियेत नियमभंग आणि भेदभाव झाले असल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांची बाजू प्रभावीपणे अॅड. दीपक चटप यांनी न्यायालयासमोर मांडली. याचिकाकर्ते सौरभ मादासवार व जगन्नाथ पिदूरकर यांनी जाहिरातीत नमूद अटी व पात्रता निकषांमध्ये विसंगती असल्याचा दावा केला आहे.
न्यायालयाने प्राथमिक सुनावणीत कोराडी गावातील उमेदवारांना २५ अतिरिक्त गुण देणे, प्रकल्पग्रस्तांसाठी ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण, तसेच सीएसआर प्रशिक्षण घेतलेल्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना २५ पर्यंत बोनस गुण देणे भेदभावपूर्ण असल्याचा निष्कर्ष नोंदविला. दरम्यान, महाजेनको आणि अन्य प्रतिवाद्यांना दोन आठवड्यांच्या आत आपले उत्तर सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Comments are closed.