गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा दिली जाते. यासाठी अनेक आरोग्य उपकेंद्रे उभारण्यात आली असून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, या विभागात अधिकारी आणि कर्मचार्यांची तब्बल २५१ पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर मोठा ताण येत आहे.

जिल्ह्यात सध्या ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २६३ उपकेंद्रे, २६ आयुर्वेदिक दवाखाने, ३ आग्ल दवाखाने आणि ४ फिरते दवाखाने कार्यरत आहेत. मंजूर आकृतिबंधानुसार एकूण ९३८ पदे असावीत, पण त्यापैकी २५१ पदे रिक्त आहेत.
यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संसर्गजन्य रोग अधिकारी पदे रिक्त आहेत. तसेच जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी पद अजून मंजूर झालेले नाही. ८ तालुक्यांतील आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी श्रेणी ‘अ’ यांच्या रिक्त पदांबाबत सरकारला माहिती देण्यात आली असून लवकरच नियुक्त्या होण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असली तरीही, जिल्हा विविध आरोग्य उपक्रमांत अग्रणी आहे.
- वैद्यकीय अधिकारी श्रेणी २ ची ५६ पदांपैकी ५ पदे रिक्त
- औषध निर्माण अधिकारी ४४ पैकी १ जागा रिक्त
- महिला आरोग्य सहाय्यक ४० पैकी ११ पदे रिक्त
- एएनएम ३६६ पैकी १५१ पदे रिक्त
- आरोग्य सेवक ५३ आणि स्वच्छक १६ पदे रिक्त
रुग्णवाहिकेवरील चालक मात्र कंत्राटी पद्धतीने नेमले गेले आहेत. अधिकारी आणि कर्मचार्यांची पदे भरल्यानंतर आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.