राज्यातील डॉक्टरी शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. Maharashtra Public Health Department मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी तब्बल १४४० जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. दीर्घ काळानंतर आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर भरती होत असल्यामुळे राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मानली जात आहे.

या भरती मोहिमेत ‘वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-MBBS’ आणि ‘वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-विशेषज्ञ’ या दोन पदांसाठी एकूण १४४० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० मार्च ठेवण्यात आली आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबतही स्पष्ट अटी देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी (MO)-MBBS पदासाठी उमेदवाराकडे MBBS पदवी असणे आवश्यक आहे. तर वैद्यकीय अधिकारी (MO)-विशेषज्ञ पदासाठी संबंधित विषयातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास १८ ते ३८ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. तसेच इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिक दुर्बल घटक (EWS) उमेदवारांना ५ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
परीक्षा शुल्काबाबतही माहिती देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. तर OBC, EWS, अनाथ, दिव्यांग, महिला आणि खेळाडू उमेदवारांसाठी ७०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.
एकूणच, राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि तरुण डॉक्टरांना सरकारी सेवेत संधी देण्यासाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.