राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेबाबत पुन्हा एकदा अडचणी उभ्या राहिल्या असून लाभार्थींमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे. दिवाळीपूर्वी तरी योजनेची रक्कम खात्यात जमा होईल, अशी मोठी अपेक्षा महिलांना होती. मात्र, तांत्रिक झालेल्या अडचणींमुळे अद्याप दोन ते तीन महिन्यांची रक्कम प्रलंबितच आहे.
हमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष एच. एम. रेवण्णा यांनी नुकतेच केलेल्या विधानामुळे संभ्रम आणखी वाढला आहे. दरमहा गृहलक्ष्मीची रक्कम देणे शक्य नसून आता तीन महिन्यातून एकदाच हप्ता जमा केला जाईल, असे ते म्हैसूर येथे बोलताना म्हणाले. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे – “मग आम्हाला प्रत्यक्ष लाभ कितपत आणि कधी मिळणार?”
तांत्रिक व प्रशासकीय अडचणी, त्यातच जीएसटीशी संबंधित मुद्द्यांमुळे निधी वेळेवर जमा करण्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येत आहे. समस्या निकाली काढण्याचे काम सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी दिवाळीपूर्वी रक्कम खाती भरली असती, तर गोरगरीबांच्या सणाचा उत्साहही द्विगुणित झाला असता, अशी हळहळ जनतेतून व्यक्त होते आहे.
गृहलक्ष्मी योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कर्नाटक सरकारची प्रमुख योजना मानली जाते. मात्र निधी विलंबामुळे आनंदाची अपेक्षा असलेल्या अनेक महिलांची दिवाळी यंदा फिकी झाल्याचे चित्र दिसत आहे.

Comments are closed.