महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2025 साली संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब) साठी ६७४ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेत पोलीस उपनिरीक्षक (PSI) ३९२ जागांचा समावेश आहे. सामान्यपणे ही परीक्षा डिसेंबर-जानेवारीत जाहिरात होऊन मार्च-मे दरम्यान घेतली जाते.
पण यंदा २९ जुलै २०२५ रोजी जाहिरात आणि ९ नोव्हेंबर २०२५ रोजी परीक्षा ठरल्यामुळे वयोमर्यादा गणण्याची तारीख १ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे.
यामुळे PSI पदासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडल्यामुळे हानी होऊ शकते, अशी काळजी व्यक्त झाली आहे. त्यामुळे या उमेदवारांना एक विशेष संधी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व MPSC कडे केली आहे.
याअंतर्गत २०२३ ते २०२५ दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेसाठी विशेष संधी देण्याचा निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. या भरतीतून २८२ पूर्वीच्या जागा आणि नवीन समावेश झालेल्या ३९२ जागा मिळून एकूण ६७४ जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामुळे परीक्षार्थींना मोठा फायदा मिळेल.
