राज्यातील अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यभरात लवकरच सहा हजारांहून अधिक प्राध्यापक पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा केली.

राज्यातील सुमारे १,२०० अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५,४०० प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असून, विविध विद्यापीठांमध्येही सुमारे ७०० पदांवर भरती होणार आहे. विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी राज्यपालांच्या सूचनेनुसार ६०-२०-२० हे सूत्र लागू करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी ६० गुण, अध्यापन कौशल्यासाठी २० गुण आणि मुलाखतीसाठी २० गुण असे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
दरम्यान, उच्च शिक्षणाच्या विस्तारासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत येत्या शैक्षणिक वर्षात ३८ नवीन पदवी महाविद्यालयांना तत्त्वतः मंजुरी दिली आहे. यापैकी तब्बल २७ महाविद्यालये केवळ महिलांसाठी असणार आहेत. या महिला महाविद्यालयांचा समावेश श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांच्या कार्यक्षेत्रात होणार असल्याने विद्यापीठाच्या कक्षा विस्तारण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments are closed.