महाराष्ट्रातील तरुणांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. देशाच्या लोकसंख्येत १८ ते ४५ वयोगटातील कार्यप्रवण तरुणांचे प्रमाण मोठे असून, या गटाला रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे.
याच उद्देशाने ‘महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था’ म्हणजेच महिमा या संस्थेची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले.
या संस्थेमार्फत राज्यातील तरुणांना विविध देशांतील नोकरीच्या संधी, आवश्यक पात्रता, कौशल्य विकास तसेच आंतरराष्ट्रीय रोजगार प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यामुळे तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचा जागतिक रोजगार बाजारात प्रवेश सुलभ होणार आहे.
महिमा संस्थेमुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी परदेशी नोकऱ्यांचे नवे दालन खुले होणार असून, रोजगाराच्या संधी वाढण्यासोबतच राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळणार आहे.

Comments are closed.