जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला जर्मनी सध्या मोठ्या ‘डेमोग्राफिक क्रायसिस’चा सामना करत आहे. अनुभवी कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवृत्त होत असून, देशांतर्गत तरुण मनुष्यबळाची कमतरता तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीने कुशल कामगारांसाठी भारताकडे मोर्चा वळवला असून, भारतीयांसाठी नोकरीच्या दारांना मोठ्या प्रमाणात खुली केली आहेत. विशेष म्हणजे, भारतासाठी वार्षिक व्हिसा कोटा २० हजारांवरून थेट ९० हजारांपर्यंत वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे भारतीय तरुणांसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरत आहे.

‘बर्टेल्समन फाउंडेशन’च्या अहवालानुसार, जर्मनीला दरवर्षी किमान २.८८ लाख परदेशी कामगारांची गरज आहे. ही गरज पूर्ण न झाल्यास २०४० पर्यंत जर्मनीचे कार्यबळ सुमारे १०% ने घटण्याची शक्यता आहे. भारतात २५ वर्षांखालील मोठ्या प्रमाणात तरुण मनुष्यबळ उपलब्ध असल्याने जर्मनीसाठी भारत हा महत्त्वाचा ‘लेबर सप्लायर’ ठरत आहे. जर्मनीमध्ये केवळ आयटी क्षेत्रातच नव्हे, तर फायनान्स, इन्शुरन्स, ऊर्जा, मॅन्युफॅक्चरिंग, तांत्रिक सेवा आणि शिक्षण क्षेत्रातही आकर्षक पॅकेजसह नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. काही क्षेत्रांमध्ये वार्षिक पगार ६८ लाखांपासून जवळपास १ कोटी रुपयांपर्यंत मिळत असल्याचे दिसून येते.
जर्मनीत नोकरी मिळवण्यासाठी योग्य तयारी करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील मागणी ‘Indeed’ किंवा ‘Monster’सारख्या पोर्टल्सवर तपासावी. जर्मन भाषेचे किमान B1 स्तराचे ज्ञान असणे आवश्यक मानले जाते, त्यामुळे वेळेत भाषा शिकण्यास सुरुवात करावी. त्यानंतर जर्मन मानकांनुसार ATS-फ्रेंडली रिझ्युमे तयार करून ‘Arbeitsagentur’ आणि ‘JobMESH’सारख्या पोर्टल्सवर अर्ज करावा.
निवड झाल्यास ऑनलाइन मुलाखत दिली जाते, ज्यात प्रामाणिकपणा आणि तांत्रिक कौशल्याला महत्त्व दिले जाते. ऑफर लेटर मिळाल्यानंतर ‘VFS Global’मार्फत वर्क व्हिसासाठी अर्ज करता येतो. तसेच, नोकरी न मिळाल्यास ‘जॉब सीकर व्हिसा’द्वारे एक वर्षासाठी जर्मनीत जाऊन नोकरी शोधण्याची संधीही उपलब्ध आहे.

Comments are closed.