महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने (बालभारती) ‘ब्रुक वन: वाट जर्मनीची, संधी प्रगतीची’ हे विशेष जर्मन कोर्सबुक विकसित केले आहे. यामुळे मराठी भाषिकांसाठी जर्मन भाषा शिकणे सुलभ होणार आहे.
राज्य सरकारने बाडेन-वुटेनबर्ग (जर्मनी) राज्याशी करार केला असून, पहिल्या टप्प्यात १० हजार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन जर्मनीत नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मात्र, तिथे काम करण्यासाठी जर्मन भाषा आवश्यक असल्याने हा नवीन अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे.
या कोर्सबुकमध्ये जर्मन मुळाक्षरांपासून गणितीय आकडेमोडपर्यंत सर्व महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. यासोबतच जर्मन शब्दांचे मराठीत अर्थ, आवश्यक परीक्षा आणि तयारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे आरोग्यसेवा, आतिथ्य, तंत्रज्ञान, बांधकाम व अन्य क्षेत्रांमध्ये जर्मनीत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.