जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा परिणाम आता थेट भारतीय स्वयंपाकघरावर दिसू लागला आहे. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करताना बुकिंगच्या नियमांमध्येही मोठे बदल जाहीर केले आहेत. मध्य आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस आयात प्रभावित होत असल्याने ऊर्जा वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

७ मार्च रोजी सिलिंडरच्या किमतीत सुमारे ७% वाढ करण्यात आली असून, १४.२ किलोचा गॅस सिलिंडर आता ९६५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वर्षभर स्थिर असलेले दर अचानक वाढल्याने सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांच्या बजेटवर ताण आला आहे. मात्र, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपयांची सबसिडी थेट खात्यात मिळत असल्याने त्यांना हा सिलिंडर सुमारे ५५० रुपयांत उपलब्ध होत आहे.
बुकिंगच्या नियमांमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात आता एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी २५ दिवसांऐवजी ४५ दिवसांची प्रतीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. शहरांमध्ये मात्र ही मर्यादा २५ दिवसांपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. एका कुटुंबाला वर्षाला जास्तीत जास्त १५ सिलिंडर बुक करता येणार असून त्यापैकी १२ सिलिंडर सबसिडीवर असतील. तसेच घरात फक्त २ सिलिंडर ठेवण्याची परवानगी असेल.
पाईप गॅस (PNG) कनेक्शन असलेल्या घरांसाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. अशा ग्राहकांना घरगुती एलपीजी सिलिंडर ठेवण्यास मनाई करण्यात आली असून गॅस कंपन्यांना त्यांना नवीन कनेक्शन किंवा रिफिल न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोन्ही सुविधा असलेल्या ग्राहकांनी एलपीजी कनेक्शन स्वेच्छेने सरेंडर करणे बंधनकारक आहे.
भारत सध्या आपल्या गॅस गरजांपैकी सुमारे ९०% आयातीवर अवलंबून आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ मार्ग बाधित झाल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि रशियाकडून गॅस खरेदी वाढवण्याच्या तयारीत आहे. तसेच देशांतर्गत उत्पादन २८% ने वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे

Comments are closed.