गणेशोत्सवात मोफत बससेवेची राजकीय स्पर्धा! | Ganeshotsav Free Bus Service Politics!

Ganeshotsav Free Bus Service Politics!

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी यंदा पुन्हा एकदा मोफत बससेवेची घोषणांची लाट आली आहे. कोकण रेल्वेच्या सर्व नियमित आणि विशेष गाड्यांना हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाल्यामुळे हजारो कोकणवासीयांना तिकीट मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली या भागांतून मोठ्या प्रमाणावर मोफत बसेस धावणार असल्याचे सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जाहीर केले आहे.

Ganeshotsav Free Bus Service Politics!

गेल्या महिनाभरापासूनच पक्षांच्या जनसंपर्क कार्यालयांत ओळखपत्रांच्या आधारे अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे कोकणातील मतदारांची मने जिंकण्यासाठी राजकीय पक्षांची ही मोफत सेवा महत्त्वाची ठरत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील महापालिकांच्या निवडणुका गणेशोत्सवानंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. काही पक्ष फक्त ‘जाण्याची’ व्यवस्था करत असताना काही ठिकाणी ये-जा दोन्हींची सोय केली जाते. त्यामुळे “जाणे सोपे, येणे कठीण” अशी परिस्थिती कोकणवासीयांपुढे उभी राहते.

शिवसेना, मनसे, भाजप यांच्यासह इतर पक्षांनी शहरातील ठिकठिकाणी बॅनरबाजी करून नागरिकांना नावनोंदणीसाठी आवाहन केले आहे. सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅपवरूनसुद्धा मोफत बस सेवेबद्दल प्रचार सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, खेड, चिपळूण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा यांसह पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाणांसाठीदेखील बससेवेची घोषणा झाली आहे.

रेल्वेतील ‘वेटिंग’ तिकिटांच्या समस्येमुळे अनेक कोकणवासीय आता खात्रीशीर प्रवासासाठी बससेवेवर अवलंबून राहू लागले आहेत. काहीवेळा कोकण रेल्वेत विशेष गाड्या सोडल्या जातात, पण प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना प्रवासात त्रास होतो. त्यामुळे मोफत बस सेवेचा पर्याय कोकणवासीयांसाठी अधिक सोयीचा ठरत आहे.

या मोफत बसेसमध्ये एसटी महामंडळाच्या गाड्यांपासून खाजगी लग्झरी बसपर्यंत सर्व गाड्यांचा समावेश आहे. चांगल्या सुविधांमुळे नागरिक प्राधान्याने नोंदणी करत आहेत. मुंबईतील दादर, अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, बोरिवली यांसारख्या उपनगरांतून तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार आणि मिरा-भाईंदरमधून मोठ्या प्रमाणावर बसेस सोडल्या जाणार आहेत.

दरवर्षीप्रमाणेच यंदाही राजकीय पक्ष या बससेवेच्या माध्यमातून कोकणवासीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रवासाची ही सोय मतदारांसाठी सुखकर ठरत असली तरी त्यामागे राजकीय समीकरणेही ठळकपणे दिसून येत आहेत.

Comments are closed.