अर्धापूर येथे भव्य युवा रोजगार मेळावा संपन्न
विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण घेत असताना किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर छोटे-मोठे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम करावेत, जेणेकरून त्यांना करिअर घडविता येईल आणि चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील, असा महत्त्वाचा सल्ला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिला.
अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयात आमदार श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून भव्य युवा उमेदवार रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हजारो युवक-युवती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण होते, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कुलगुरू मनोहर चासकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, माजी आमदार अमर राजुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कौशल्याशिवाय नोकरी मिळणे कठीण
राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात फक्त पदवी मिळवून उपयोग नाही. विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. रोजगाराच्या नवीन संधी शोधण्यासाठी विद्यापीठांनी कमी कालावधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना लगेच रोजगाराच्या संधी मिळू शकतील.
मराठा समाजासाठी कर्ज परतावा योजना
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी महामंडळाच्या वतीने कर्ज परतावा योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत मराठा समाजातील युवकांना त्यांना हवे असलेल्या क्षेत्रात व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज मिळू शकते आणि हे कर्ज सरकारकडून परत करण्यात येते. त्यामुळे युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
रोजगार आणि उद्योगासाठी विशेष प्रयत्न
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योग उभारण्यासाठी सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. या रोजगार मेळाव्यासाठी शेकडो कंपन्या आल्या आहेत आणि लवकरच हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविला जाईल.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कुलगुरू मनोहर चासकर यांनी विद्यार्थ्यांना रोजगार संधींबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना लहान संधींना स्वीकारण्याचा सल्ला दिला आणि मेहनतीने मोठ्या संधी मिळविण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नरेंद्र चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन विश्वंधार देशमुख यांनी केले.