राज्यातील अकरावी (FYJC) प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. अंतिम विशेष फेरीत महाविद्यालय अलॉट होऊनही प्रवेश निश्चित न केलेले तसेच प्रवेश अर्ज भरूनही अद्याप महाविद्यालय न मिळालेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली असून १० जानेवारीपर्यंत चालणार आहे.
२०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मे महिन्यापासून सुरू होती. यातील अंतिम विशेष प्रवेश फेरी १३ ते १७ डिसेंबरदरम्यान पार पडली. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रवेशासाठी नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या टप्प्यात विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांशी संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
राज्य प्रवेश नियंत्रण समितीने विभागीय शिक्षण उपसंचालकांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ८ ते १० जानेवारीदरम्यान विद्यार्थ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तसेच ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २१,५९,२३२ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत विविध प्रवेश फेऱ्यांमधून सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, अद्यापही अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असल्याने ही अतिरिक्त प्रवेश फेरी सुरू करण्यात आली आहे.

Comments are closed.