भारतातील १३० कोटी नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) शास्त्रीय निकष ठरवते तसेच अन्ननिर्मिती, साठवणूक, वितरण, विक्री व आयात यांचे नियमन करते.
अन्नसुरक्षा व स्वच्छतेबाबत अचूक व विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी देशभर माहिती-जाळे उभारण्याची जबाबदारीही FSSAIकडे आहे.
या उद्दिष्टांना पूरक ठरावा म्हणून FSSAIकडून इंटर्नशिप योजना 2026 जाहीर करण्यात आली असून जानेवारी 2026 पासून ही इंटर्नशिप सुरू होणार आहे. अन्न व पोषण क्षेत्रातील तरुणांना प्रत्यक्ष प्रकल्पांद्वारे अनुभव देणे आणि उद्योग–शैक्षणिक संस्थांमधील समन्वय वाढवणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. इंटर्नशिपचा कालावधी किमान 2 महिने ते कमाल 6 महिने इतका असेल.
मान्यताप्राप्त संस्थांमधील पूर्णवेळ पदवी, पदव्युत्तर किंवा उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थीच अर्ज करू शकतात. फूड टेक्नॉलॉजी, केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, अॅग्रिकल्चर, पब्लिक हेल्थ, मॅनेजमेंट, मीडिया, आयटी, पब्लिक पॉलिसी, कायदा अशा विविध शाखांतील विद्यार्थ्यांसाठी ही संधी खुली आहे. अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी मात्र अपात्र ठरतील.
ही इंटर्नशिप FSSAI मुख्यालय (नवी दिल्ली), प्रादेशिक कार्यालये (चेन्नई, कोलकाता) तसेच राष्ट्रीय अन्न प्रयोगशाळा (गाझियाबाद, कोलकाता, चेन्नई, रक्सौल) येथे उपलब्ध असेल. इंटर्नना स्वतःचा लॅपटॉप वापरावा लागेल; कामाची जागा व इंटरनेट सुविधा दिली जाईल, मात्र निवास व प्रवास खर्च दिला जाणार नाही.
निवड झालेल्या इंटर्नना संपूर्ण इंटर्नशिप कालावधीसाठी ₹10,000 इतके मानधन देण्यात येईल. कामगिरी, उपस्थिती व अंतिम अहवालाच्या मूल्यमापनानंतर प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 डिसेंबर 2025 पासून सुरू होऊन 19 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. अन्न व पोषण क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची व प्रतिष्ठेची संधी मानली जात आहे.

Comments are closed.