बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वेगवान वारे आणि तापमानातील बदल यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. या पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांना संरक्षण मिळेल आणि नुकसान झाल्यास भरपाईही दिली जाईल.

योजनेत सहभागी कसे व्हावे:
फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये फळपिकाची नोंद करणे बंधनकारक आहे.
हप्ता भरण्याची पद्धत:
शेतकरी आपला विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र, बँक शाखा, किंवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॅग केलेला फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे:
- पूर्ण भरलेले विमा प्रस्तावपत्र
- सातबारा उतारा (फळबाग नोंद असलेला)
- आधार कार्ड
- स्वयंघोषणापत्र
- जिओ टॅग फोटो
- विमा हप्त्याची पावती
क्षेत्र मर्यादा:
कोकण विभागासाठी एका फळपिकाखालील किमान क्षेत्र १० गुंठे, तर सर्व फळपिकांसाठी जास्तीत जास्त ४ हेक्टर (सुमारे १० एकर) इतकी मर्यादा आहे.
महत्वाचे फायदे:
या योजनेमुळे फळबागांना नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळेल, शेतकऱ्यांना उत्पादनातील जोखीम कमी होईल, आणि नुकसान झाल्यास तत्काळ आर्थिक मदत मिळेल.
अधिक माहितीसाठी संपर्क:
आपल्या सहायक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आणि हवामानातील अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरत आहे.

Comments are closed.