लोकमत न्यूज नेटवर्क — राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील वीज ग्राहकांसाठी महावितरणकडून एक मोठी दिलासादायक योजना सुरू होत आहे. ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (स्मार्ट) योजना’ अंतर्गत पात्र घरांवर १ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार असून, त्यातून तब्बल २५ वर्षांपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.

या योजनेचा लाभ सुमारे ५ लाख घरगुती ग्राहकांना मिळणार असून, त्यात १.५४ लाख बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) आणि ३.४५ लाख आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी सरकारने ₹६५५ कोटींची तरतूद केली आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
- या योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार.
- केंद्र सरकारकडून ₹३०,००० अनुदान आणि राज्य सरकारकडून ₹१७,५०० पर्यंत अनुदान मिळेल.
- उर्वरित थोडासा हिस्सा ग्राहकांनी भरायचा असून, त्यामुळे २५ वर्षे मोफत वीज वापरता येईल.
सौर प्रकल्पाचा फायदा :
एक किलोवॅटच्या सौर प्रणालीतून दरमहा सुमारे १२० युनिट वीज निर्मिती होते. त्यामुळे १०० युनिटपर्यंत वीज वापरणारे ग्राहक आपली गरज भागवून उर्वरित वीज महावितरणला विकू शकतात.
अनुदानाचे तपशील :
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना केंद्राचे ₹३०,००० आणि राज्याचे ₹१०,००० अनुदान.
- अनुसूचित जाती व जमातीच्या ग्राहकांना राज्याकडून ₹१५,००० अतिरिक्त मदत.
महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी सांगितले की, केंद्र व राज्य सरकारच्या या संयुक्त उपक्रमामुळे ग्राहकांना अत्यल्प खर्चात मोफत वीज आणि उत्पन्न दोन्ही मिळू शकणार आहे.
ही योजना ग्रामीण आणि निम्न-आर्थिक स्तरातील ग्राहकांसाठी “ऊर्जेतील स्वावलंबनाचे” प्रतीक ठरणार आहे

Comments are closed.