निवडणुका जवळ येताच महिलांना खूश करण्यासाठी पक्षांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. पनवेलमध्ये रविवारी घेतलेल्या कार्यक्रमात घरघंटी आणि शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत हा उपक्रम राबवण्यात आला.
या अंतर्गत पनवेल परिसरातील ४,२५० महिलांना मोफत घरघंटी आणि शिलाई मशीन देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात महिलांच्या हाताला रोजगार मिळावा, तसेच त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण पनवेलमध्ये मतदारांचे मन वळवण्यासाठी पक्षांनी गती दिल्याचे चित्र दिसून येत आहे. महिलांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या मतांचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो.
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिलाई मशीन आणि घरघंटीमुळे स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
महिलांच्या घरगुती उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी ही साधनं उपयुक्त ठरणार असल्याचेही सांगण्यात आले. पनवेलमधील महिलांसाठी हा उपक्रम सध्या मोठा आधार ठरत आहे

Comments are closed.