मुख्यमंत्री फेलोशिपच्या धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेकडून ‘फेलोशिप योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत २५ पात्र तरुणांना ११ महिन्यांसाठी संधी मिळणार असून, त्यांना दरमहा २५,००० रुपये मानधन दिले जाणार आहे.
ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी तसेच नवउद्योजक, संशोधक आणि युवा नेतृत्वाला प्रशासनात सहभागी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसंधारण, महिला व बालविकास, डिजिटल प्रशासन आणि सामाजिक कल्याण यांसारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन व धोरणात्मक सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे.
फेलोशिपमुळे निवड झालेल्या तरुणांना प्रत्यक्ष प्रशासनात काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्यावर स्थानिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी असेल. या अनुभवामुळे त्यांना शासनाच्या कार्यपद्धतीची तसेच योजना अंमलबजावणी आणि धोरणरचनेची समज मिळणार आहे.
युवा दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा लाभ जिल्हा प्रशासनाला होईल, त्यामुळे प्रशासन अधिक प्रभावी आणि सक्षम होण्यास मदत होईल. ही योजना जिल्ह्यातील तरुणांसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे!