औरंगाबाद, २५ ऑगस्ट: शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या कलात्मक संधीवर आता खर्चाचं मोठं सावट पडलंय. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांचं शुल्क दुप्पट करण्यात आलं असून, ८ ते १० लाख विद्यार्थ्यांवर आर्थिक भार येणार आहे.
आतापर्यंत एलिमेंटरीसाठी ५० रुपये आणि इंटरमिजिएटसाठी १०० रुपये इतकं शुल्क होतं. पण २०२५ पासून ते थेट १०० आणि २०० रुपये करण्यात आलंय. कला संचालनालयानं १८ जुलै रोजी दिलेल्या परिपत्रकामुळे पालक आणि कलाप्रेमी नाराज झालेत.
ही परीक्षा फक्त चित्रकलेपुरती मर्यादित नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या भारतीय संस्कृती, परंपरेशी नातं जोडते. विशेषतः शेतकरी, मोलमजूर, आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होतात.
रंगसाहित्य, प्रवासखर्च, केंद्रावरची व्यवस्था – आधीच खर्च वाढलेला. त्यात आता शुल्क वाढल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न अधुरं राहण्याची भीती पालक आणि शिक्षक मंडळींना सतावत आहे.
शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्या, आणि जुन्याच दरांनुसार परीक्षा घ्या, अशी कलाप्रेमींची मागणी वाढतेय.

Comments are closed.