परदेशात दंतशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून भारतात वैद्यकीय सेवा देण्याची इच्छा असलेल्या दंतचिकित्सकांसाठी फॉरेन डेंटल स्क्रीनिंग टेस्ट (FDST) ही अनिवार्य परीक्षा आहे.
सन 2026 मधील ही परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी होणार असून, तिचा निकाल 21 मार्चपर्यंत जाहीर केला जाणार असल्याची माहिती नॅशनल बोर्ड ऑफ एक्लॅमिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) यांनी दिली आहे.
परदेशातून MDS किंवा पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केलेल्या दंतचिकित्सकांना भारतात थेट प्रॅक्टिसची परवानगी नसते. FDST परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच नोंदणी व वैद्यकीय सेवा देण्याची मान्यता मिळते. त्यामुळे विदेशात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा करिअरमधील अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा मानली जाते.
यंदाची FDST परीक्षा संगणकाधारित पद्धतीने फक्त नवी दिल्ली येथील केंद्रावर घेतली जाणार आहे. परीक्षा दोन सत्रांत होईल—पहिला पेपर सकाळी 9 ते 11, तर दुसरा पेपर दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत. दोन्ही पेपरमधील एकत्रित गुणांवर अंतिम निकाल ठरवला जाणार आहे.
उमेदवारांच्या तयारीसाठी NBEMS कडून संकेतस्थळावर मॉक टेस्ट (सराव परीक्षा) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे परीक्षेचा पॅटर्न, वेळ व्यवस्थापन आणि तांत्रिक बाबींचा सराव करता येणार आहे. सविस्तर वेळापत्रक, पात्रता अटी आणि नियमावली असलेली माहिती पुस्तिका 17 फेब्रुवारीपासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Comments are closed.