‘संवाद सेतू’ उपक्रम : शेतकरी–कृषी विभाग नात्याला नवी उंची! | Sanvad Setu: Strengthening Farmer–Agriculture Department Ties!

Sanvad Setu: Strengthening Farmer–Agriculture Department Ties!

राज्याचा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील वर्षानुवर्षांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी नव्या वर्षात ‘संवाद सेतू’ हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत कृषी अधिकारी आठवड्यातून दोन दिवस थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि अनुभव प्रत्यक्ष समजून घेता येणार आहेत.

Sanvad Setu: Strengthening Farmer–Agriculture Department Ties!

या उपक्रमासोबतच गावपातळीवर कार्यरत असलेल्या सुमारे ८ हजार कृषी अधिकाऱ्यांना कार्यालयासाठी जागा, लॅपटॉप आणि आवश्यक फर्निचर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे क्षेत्रीय कामकाज अधिक प्रभावी होणार आहे.

कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे आणि कृषी संचालक रफिक नाईकवाडी (विस्तार व प्रशिक्षण) यांच्या संकल्पनेतून ‘संवाद सेतू’ उपक्रम साकारत आहे. कृषी विभागाकडे एकूण २७ हजार मंजूर मनुष्यबळ असून त्यापैकी १९ हजार पदे भरलेली आहेत. यातील १३,५०० अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रात, तर ८,६०० अधिकारी गावपातळीवर थेट उपलब्ध आहेत.

कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले की,
“कृषी विभाग ही शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेली सर्वात मोठी यंत्रणा आहे. आजपर्यंत भेटीगाठी प्रामुख्याने शेतीशाळा, चर्चासत्रे किंवा तपासण्यांच्या निमित्ताने होत असत; पण त्यातून अपेक्षित संवाद घडत नव्हता. म्हणूनच ‘संवाद सेतू’च्या माध्यमातून अधिकारी त्यांच्या सोयीनुसार, वेळेनुसार आणि कार्यक्षेत्रातील कोणत्याही भागात जाऊन शेतकऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधतील.”

या उपक्रमात कोणतेही नियम, सक्ती किंवा अहवालांची बंधने नसतील. “अमूक इतक्या शेतकऱ्यांना भेटावे” अशी अट नसेल. सामाजिक बांधिलकी आणि पालकत्वाच्या भावनेतून अधिकारी शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतील, त्यांच्या समस्या जाणून घेतील, सूचना व मार्गदर्शन स्वीकारतील. या संवादातून मिळणाऱ्या अभिप्रायाचा उपयोग कृषी कामकाजात सुधारणा करण्यासाठी केला जाणार आहे.

गावागावात कार्यरत असलेली कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. नात्यागोत्यात जाऊन जशी आपुलकीने गप्पागोष्टी होतात, तसाच आपुलकीचा संवाद ‘संवाद सेतू’मुळे शेतकऱ्यांशी निर्माण होणार आहे.

Comments are closed.