राज्यातील बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणांचा मोठा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक (SIT) सक्रिय झाले आहे. राज्यभरातील सर्व शालार्थ आयडी प्रकरणांची तपासणी केली जाणार असून, २०१२ पासूनची सर्व प्रकरणे तपासाच्या कक्षेत असतील.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागात शिक्षणाधिकारी कार्यालयांकडून शालार्थ आयडीशी संबंधित संचिकांचा शोध व पडताळणी सुरू झाली आहे. उपलब्ध कागदपत्रांचे डिजिटायझेशन आणि स्कॅनिंग वेगाने केले जात असून, वरिष्ठ कार्यालयाला लवकरच अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पूर्वी नागपूरसह राज्यातील अनेक भागांत अपात्र व्यक्तींना शालार्थ प्रणालीत समाविष्ट करून वेतन दिल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन केली.
या चौकशीत अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक-कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता, सेवासातत्य, शालार्थ मंजुरी आणि पदोन्नतीची तपासणी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातच ४,०७५ शालार्थ आयडी प्रकरणे तपासणीसाठी संकलित केली जात असून, गरज भासल्यास संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा पाठविण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Comments are closed.