राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने आपत्तीग्रस्त घोषित केलेल्या तालुक्यांतील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी लागू करण्यात आली आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केला आहे.राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना दुष्काळसदृश्य परिस्थितीत दिल्या जाणाऱ्या सवलतीनुसार अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे तसेच सर्व महाविद्यालयांची परीक्षा शुल्क माफी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे संबंधित तालुक्यांतील विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी होणार आहे.
ही सवलत शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठी लागू राहणार असून, आवश्यक वित्तीय तरतूद उपलब्ध करण्याची जबाबदारी उच्च शिक्षण संचालकांवर सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments are closed.