राज्य सरकारनं अखेर चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीपासूनच ही परीक्षा होणार असल्याचं 17 ऑक्टोबरच्या शासन निर्णयातून जाहीर करण्यात आलं.
मात्र, या परीक्षेचा अभ्यासक्रमच अजून तयार नाही, आणि एक सत्र संपल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे — “शिकवायचं काय आणि कधी?”
२०१६ पासून चौथी-सातवीऐवजी ही परीक्षा पाचवी आणि आठवीसाठी घेतली जात होती. पण शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांच्या मागणीनंतर पुन्हा पूर्ववत चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, या वर्षी चारही वर्गांसाठी — चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी — परीक्षा घ्यावी लागणार आहे.
पाचवी आणि आठवीचा अभ्यासक्रम आधीच ठरलेला असला, तरी चौथी आणि सातवीसाठीचा नवा अभ्यासक्रम अजून तयारच झालेला नाही. हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या संस्थेकडून तयार होणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल किंवा मे २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. पण एक सत्र संपून गेल्यानंतर, अजून अभ्यासक्रमच न ठरल्याने विद्यार्थ्यांची तयारी कशी होणार, हा शिक्षकांसमोरचा मोठा प्रश्न आहे.

Comments are closed.