महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व गट-ब (अराजपत्रित) परीक्षा आणि नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी – २१ डिसेंबर रोजी येत असल्याने हजारो उमेदवार संभ्रमात सापडले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचे आदेश दिल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत ६७४ पदांसाठी उमेदवार बसणार आहेत. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक अशी महत्त्वाची पदे समाविष्ट आहेत. परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार की मतमोजणीमुळे बदल करण्यात येणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
कोरोनानंतर एमपीएससीच्या परीक्षा सतत पुढे ढकलल्या जात असल्याने विद्यार्थ्यांचा संयम ताणला गेला आहे. आता पुन्हा मतमोजणी आणि परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. परीक्षा वेळेत होणार की पुढे ढकलली जाणार, याबाबत आयोगाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

Comments are closed.