नोकरी बदलताना अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो— “आता माझ्या पीएफ खात्यातील पैशांचं काय होणार?” नोकरी सोडल्यानंतर ईपीएफमधील रक्कम नष्ट होते का, की ती सुरक्षित राहते? चला तर मग, याबाबतचे नियम सोप्या भाषेत समजून घेऊया.

नोकरी बदलली म्हणून तुमचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) बंद होत नाही. EPFO च्या नियमानुसार, तुमच्या खात्यात जमा असलेली संपूर्ण रक्कम तुमच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) अंतर्गत सुरक्षित राहते. नवीन नोकरीत रुजू झाल्यानंतर त्या एकाच यूएएनला नवीन मेंबर आयडी जोडला जातो. मात्र, जुना पीएफ खाते नवीन खात्यात योग्य पद्धतीने हस्तांतरित (Transfer) करणे आवश्यक असते. बहुतांश अडचणी नियमांमुळे नाही, तर कागदपत्रांची कमतरता किंवा पोर्टलवरील तांत्रिक त्रुटींमुळे येतात.
यूएएन एकच असणं अत्यंत महत्त्वाचं
यूएएन हा आयुष्यभरासाठी एकच असतो. मात्र, जुना यूएएन न दिल्यास किंवा नाव, जन्मतारीख, आधार तपशील यात फरक असल्यास नवीन यूएएन तयार होऊ शकतो. एकापेक्षा जास्त यूएएन असल्यास तुमचा सेवा कालावधी तुटतो, ईपीएफ हस्तांतरण रखडतं आणि भविष्यात पैसे काढताना अडचणी निर्माण होतात.
ईपीएफ काढू नका, हस्तांतर करा
नोकरी बदलल्यानंतर लगेच पीएफ काढण्यापेक्षा फॉर्म 13 भरून हस्तांतरण करणे हा योग्य पर्याय आहे. हा फॉर्म आता ऑनलाइन भरता येतो. यामुळे तुमची सेवा सलग राहते आणि निवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम जमा होते.
केवायसी पूर्ण असणं गरजेचं
अनेक वेळा केवायसी अपूर्ण असल्यामुळे पीएफची प्रक्रिया अडकते. आधार, पॅन आणि बँक खात्याची माहिती यूएएनला जोडलेली व मंजूर असणं आवश्यक आहे. नावातील छोटासा फरकही अडचण निर्माण करू शकतो, त्यामुळे तपशील अचूक असणं फार महत्त्वाचं आहे.
‘एक्झिट डेट’ अपडेट झाली आहे का?
मागील नियोक्त्याने तुमची Exit Date अपडेट केली नसेल, तर पीएफ हस्तांतरण किंवा दावा थांबतो. त्यामुळे नोकरी सोडल्यानंतर ही तारीख अपडेट झाली आहे का, हे नक्की तपासा.
लक्षात ठेवा हे सोपे नियम
प्रत्येक नोकरी बदलताना एकच यूएएन वापरा, केवायसी नेहमी अपडेट ठेवा आणि ईपीएफ शक्य तितक्या लवकर हस्तांतरित करा. असं केल्यास भविष्यातील आर्थिक अडचणी आणि अनावश्यक त्रास सहज टाळता येईल.

Comments are closed.