इंजिनीअरिंग सीईटीसाठी आजपासून नोंदणी सुरू; दोन वेळा परीक्षा देण्याची संधी! | Engineering CET Registration Begins, Two Attempts!

Engineering CET Registration Begins, Two Attempts!

शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) तसेच कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी (PCM व PCB) परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला आज, शनिवारपासून सुरुवात झाली आहे. ही नोंदणी प्रक्रिया १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, याच कालावधीत एमबीए व एमएमएस अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठीही अर्ज करता येणार आहेत.

Engineering CET Registration Begins, Two Attempts!

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) यंदापासून एमएचटी सीईटी आणि एमबीए-एमएमएस सीईटी या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावरील जेईई (मेन) परीक्षेप्रमाणेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही अधिक संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना किमान एक परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी परीक्षा ऐच्छिक असेल.

अर्ज भरताना विद्यार्थ्यांना एक किंवा दोन परीक्षा द्यायच्या आहेत, याचा निर्णय अर्जाच्या टप्प्यावरच घ्यावा लागणार आहे. नंतर हा निर्णय बदलता येणार नाही. दोन परीक्षा दिल्यास दोन्ही परीक्षांपैकी अधिक गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

यानुसार एमएचटी सीईटी (PCM व PCB) परीक्षेची पहिली संधी ११ ते २६ एप्रिल २०२६, तर दुसरी संधी १० ते १७ मे २०२६ या कालावधीत होणार आहे. एमबीए व एमएमएस अभ्यासक्रमांसाठी पहिली संधी ६ ते ८ एप्रिल २०२६, तर दुसरी संधी ९ मे २०२६ रोजी घेतली जाणार आहे.

सीईटी परीक्षेसाठीची ऑनलाईन अर्जप्रक्रिया, सविस्तर वेळापत्रक व माहिती पुस्तिका सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, सर्व परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. मागील वर्षी एमएचटी सीईटी (PCM) परीक्षेसाठी ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, हे विशेष उल्लेखनीय आहे.

Comments are closed.