राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल झाल्याने राज्यभरातील शिक्षकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक ड्युटी आणि शिक्षकांसाठी सक्तीच्या असलेल्या सीटीईटी (CTET) परीक्षा एकाच दिवशी आल्याने शिक्षकांची मोठी कोंडी झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख ७ फेब्रुवारी २०२६ निश्चित केली असून, मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र याच कालावधीत, म्हणजे ७ व ८ फेब्रुवारी रोजी सीटीईटी परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे. त्यामुळे ७ फेब्रुवारीला परीक्षा असलेल्या शिक्षकांना मतदान ड्युटीमुळे परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता आहे. तसेच ८ फेब्रुवारीला परीक्षा असलेल्या शिक्षकांचे केंद्र दुसऱ्या जिल्ह्यात असल्यास त्यांनाही मतदान प्रक्रिया पूर्ण करून वेळेत परीक्षेला पोहोचणे कठीण ठरणार आहे.
मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि सोलापूरसह विविध ठिकाणी ही परीक्षा होणार असल्याने समस्या अधिक गंभीर झाली आहे. यामुळे शिक्षक संघटनांनी शिक्षकांवरील निवडणूक कामाची जबाबदारी रद्द करून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सीटीईटी परीक्षा ही केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने ती पुढे ढकलायची असल्यास केंद्र सरकारलाच निर्णय घ्यावा लागणार आहे. एकीकडे न्यायालयाने सीटीईटी परीक्षा बंधनकारक केली आहे, तर दुसरीकडे निवडणूक ड्युटीची जबाबदारी असल्याने शिक्षकांपुढे ‘निवडणूक की परीक्षा?’ असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

Comments are closed.