शिक्षणाचा अर्थ केवळ गुण, पदवी किंवा नोकरी मिळवणे इतकाच मर्यादित नसावा, तर त्यातून मिळणाऱ्या क्षमतांचा उपयोग समाजहितासाठी झाला पाहिजे, असे स्पष्ट मत प्रा. सुनील भागवत यांनी व्यक्त केले.ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६६ व्या दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

पदवी मिळवून नव्या टप्प्यावर पाऊल ठेवताना आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणामुळे माणसात नवीन विचार करण्याची, बदल स्वीकारण्याची आणि अडचणींवर मात करण्याची क्षमता निर्माण होते. जीवन हे अनिश्चिततेने भरलेले असल्याने पाठ्यपुस्तकांपलीकडील कल्पकता, भावनिक समज आणि स्वविकास यांचा उपयोग करूनच यशस्वी वाटचाल करता येते, असेही त्यांनी नमूद केले.
या दीक्षान्त सोहळ्यात २६९ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पदवी प्रदान करण्यात आली. यंदा पदवीसाठी एकूण ६४,४०७ अर्ज प्राप्त झाले असून, उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर पदव्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी संशोधन हे समाजाच्या हितासाठी असावे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातून एक प्रेरणादायी यशकथा घडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Comments are closed.