राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. याअंतर्गत, प्रत्येक शिधापत्रिकाधारकाने आपला आधार क्रमांक रेशनकार्डाशी लिंक करणे आवश्यक आहे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ३१ मार्च २०२५ ही शेवटची मुदत निश्चित केली होती. मात्र, नागरिकांची मोठी संख्या ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने आता ही मुदत वाढवून ३० एप्रिल २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील सुमारे २६ लाख ७५ हजार शिधापत्रिकाधारकांपैकी, आतापर्यंत १८ लाख नागरिकांनी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित सुमारे ८ लाख ८० हजार शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी अद्याप अपूर्ण आहे. या अपूर्ण केवायसीमुळे त्यांच्या शिधापत्रिका पुढील काळात बंद केल्या जाण्याची शक्यता आहे.
शिधापत्रिकांची माहिती आणि ओळख खात्रीसाठी ‘मेरा ई-केवायसी’ हे विशेष अॅप तयार करण्यात आले आहे. हे अँड्रॉइड अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येते. यामध्ये आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल नंबर व OTPद्वारे लॉगिन करून वापरकर्त्याचे फेस स्कॅन घेण्यात येते. त्यानंतर संबंधित शिधापत्रिका धारकाचा आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडला जातो आणि प्रक्रिया पूर्ण होते.
‘ई-केवायसी’ प्रक्रियेची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार केली जात आहे. मोफत धान्य योजनांच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी ही ओळख पटवणी आवश्यक मानली गेली आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना यासंदर्भातील आदेश दिले असून, त्यानुसार महाराष्ट्रात ही मोहिम राबवली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता यावी म्हणून ‘मेरा ई-केवायसी’ आणि UIDAI FACERD या अॅप्सचा वापर करावा. यामुळे केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही व वेळेची बचत होईल.
केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना शिधावाटप योजनेतून वगळले जाणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. यामुळे त्यांना भविष्यात मोफत धान्य योजना, अन्न सुरक्षा योजना यांचा लाभ घेता येईल.
शासनाकडून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी हेल्पलाईन व स्थानिक पुरवठा कार्यालयांमार्फत मदतीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.