मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्याने अपात्र ठरलेल्या महिलांनी मंगळवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. योजनेचा बंद झालेला लाभ तातडीने पुन्हा सुरू करावा, अशी ठाम मागणी महिलांनी यावेळी केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे व युवा जिल्हाध्यक्ष सूरज बेलोकार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.

ई-केवायसीमधील प्रश्नोत्तरांच्या पर्यायांमुळे अनेक महिलांकडून अनवधानाने चुकीची नोंद झाली. परिणामी जिल्ह्यातील ६० हजारांहून अधिक महिला पात्र असूनही अपात्र ठरल्या असून त्यांचे दरमहा १५०० रुपयांचे अनुदान बंद झाले आहे. याचा फटका शेतमजूर व मजूर महिलांना बसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नोव्हेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्यानंतर ११ जानेवारी रोजी खामगाव येथे लाडकी बहीण योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक महिलांच्या ई-केवायसीमध्ये चुकीची नोंद झाल्याचे उघड झाले. काही महिलांनी मोबाइलद्वारे ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला असता तांत्रिक अडचणींमुळे थेट लाभ बंद झाल्याचे समोर आले. सध्या अधिकृत वेबसाइट व नारीशक्ती अॅपवर ई-केवायसी प्रक्रिया बंद असल्याने महिलांसमोर कोणताही पर्याय उपलब्ध नाही, त्यामुळे असंतोष वाढत आहे.
“साहेब, दीड हजार जमा का होत नाहीत?” असा सवाल करत शेकडो महिलांनी सोमवारी बुलढाणा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयावर धडक दिली. जिल्हा कार्यालयासह मेहकर येथील एकात्मिक बाल विकास कार्यालयातही महिलांनी गर्दी करत जाब विचारला. आतापर्यंत सुरळीत मिळणारे अनुदान अचानक का बंद झाले, असा प्रश्न उपस्थित करत बंद झालेला हप्ता तातडीने सुरू करा, अशी एकमुखी मागणी महिलांनी केली.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ३८ गावांची पाणीपुरवठा योजना रखडल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. अर्धवट कामामुळे पाणीच पोहोचत नसल्याने संतप्त महिला-पुरुषांनी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष रामा थारकर यांच्या नेतृत्वात शेगाव तहसीलसमोर धरणे आंदोलन केले. २०१९ मध्ये सुरू झालेली ही योजना ठरलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्याने प्रशासनाला जबाबदार धरण्यात आले असून, “आता आणखी किती काळ वाट पाहायची?” असा थेट सवाल अधिकाऱ्यांना करण्यात आला.

Comments are closed.