मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी सक्तीचे केल्याने बुलढाणा जिल्ह्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मोबाइल किंवा संगणकवर ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे तब्बल ६८ हजार २७० महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांचा दरमहा १,५०० रुपयांचा लाभ थांबवण्यात आला आहे. पात्र असूनही अपात्र ठरल्याने अनेक महिलांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. अखेर शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत लाभार्थी महिलांची सत्यता तपासण्याचा निर्णय घेतला आहे.

तालुकानिहाय पाहता बुलढाणा, चिखली, खामगाव, मेहकर, मलकापूर यांसह सर्वच तालुक्यांतील मोठ्या संख्येने महिला अपात्र ठरल्या आहेत. आता या सर्व महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरभेटी घेऊन पडताळणी केली जाणार आहे. कुटुंबातील सदस्य नोकरीत आहे का, पेन्शनधारक आहे का, वयोमर्यादा २१ ते ६५ वर्षांदरम्यान आहे का, तसेच महिलांच्या नावावर पुरुष लाभ घेत आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे.
प्राथमिक तपासणीत ५४ हजारांहून अधिक महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचे, ९ हजारांपेक्षा जास्त महिला ६५ वर्षांवरील असल्याचे, तर काही प्रकरणांत २१ वर्षांखालील मुली व पुरुष लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. या पडताळणीचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवला जाणार असून, जे खरोखर पात्र ठरतील त्यांचा ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे. मात्र त्यासाठी महिलांना ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे.

Comments are closed.