मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अपात्र ठरलेल्या राज्यभरातील महिलांना राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने मोठा दिलासा दिला आहे. अशा महिलांना आता ३१ मार्च २०२६ पर्यंत पुन्हा नव्याने ई-केवायसी करण्याची संधी देण्यात आली आहे. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून या निर्णयामुळे हजारो लाभार्थी महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातच चुकीचा पर्याय निवडल्यामुळे सुमारे ५४ हजार ९९१ महिलांचा दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा लाभ बंद झाला होता. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत आहेत का, निवृत्तीवेतन घेतात का अशा प्रश्नांना चुकीची उत्तरे निवडल्याने अनेक महिला अपात्र ठरल्या. राज्यातील विविध जिल्ह्यांतही अशाच प्रकारचा गोंधळ झाल्याने मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित राहिल्या.
लाभार्थी महिलांची आणि क्षेत्रीय कार्यालयांची मागणी लक्षात घेऊन शासनाने योजनेच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये सुधारणा करत चुकीचे पर्याय निवडलेल्या महिलांनाच पुन्हा ई-केवायसी करण्याची विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की ३१ मार्च २०२६ नंतर पुन्हा कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, त्यामुळे पात्र महिलांनी या कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.