जिल्हा बँक भरतीवर ब्रेक; उपाध्यक्षांची थेट सहकारमंत्र्यांकडे धाव! | District Bank Recruitment Halted, Vice Chairman Approaches Minister!

District Bank Recruitment Halted, Vice Chairman Approaches Minister!

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरळसेवा व तात्पुरत्या नोकरभरतीला सहकार विभागाने थांबा दिल्यानंतर राजकीय व प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मागील वर्षी बँकेतील भरती प्रक्रिया संशयास्पद व वादग्रस्त ठरल्याने विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळात भरती करू नये, अशी सूचना भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे समोर आले होते.

District Bank Recruitment Halted, Vice Chairman Approaches Minister!

दरम्यान, बिंदू नामावली (रोस्टर) प्रस्ताव मंजुरीअभावी भरती प्रक्रिया मंत्रालयात अडकली असून, त्यामुळेच सरळसेवा भरती थांबवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेचे उपाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मंगळवारी अहमदपूर येथे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

रविवारी सहकारमंत्री नांदेडमध्ये असतानाही बँकेकडून त्यांची भेट न घेण्यात आल्याने चर्चेला उधाण आले होते. सरळसेवा भरती रखडल्यामुळे संचालक मंडळाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा विचार केला; मात्र विभागीय सहनिबंधकांनी या तात्पुरत्या भरतीस स्पष्ट मनाई केल्याने बँक व्यवस्थापनाची कोंडी झाली आहे.

विशेष म्हणजे, सहकारमंत्र्यांच्या भेटीस बेटमोगरेकर एकटेच गेले, अन्य संचालक सहभागी नव्हते. भेटीत नेमके कोणते मुद्दे चर्चिले गेले, हे जरी स्पष्ट झाले नसले तरी दोघांचे छायाचित्र समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याने ही ‘गुपचूप भेट’ सार्वजनिक झाली आहे.

दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाची येणाऱ्या शनिवारी बैठक होणार असून, विभागीय सहनिबंधकांच्या तंबीनंतर तात्पुरत्या भरतीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सहकारमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आला असावा, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

Comments are closed.