राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अचानक थांबल्याने जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नियमित मिळणारा ₹1500 चा हप्ता डिसेंबरमध्ये अनेक महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने शेकडो संतप्त महिलांनी मंगळवारी थेट महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात धडक दिली. “आमचे पैसे त्वरित द्या,” अशी ठाम मागणी करत महिलांनी आक्रमक भूमिका घेतली.

जिल्ह्यात सुमारे १० लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, त्यापैकी एक लाखांहून अधिक महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. संक्रांतीपूर्वी काहींच्या खात्यात रक्कम जमा झाली असली, तरी मोठ्या संख्येने लाभार्थी अद्याप वंचित राहिल्याने नाराजी वाढली आहे. “सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही केवळ केवायसीचे कारण पुढे केले जाते,” अशी भावना महिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, तक्रारींसाठी जाहीर केलेल्या १८१ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्कच लागत नसल्याची तक्रारही महिलांनी केली. अखेर मंगळवारी महिलांनी थेट कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रशासनाच्या माहितीनुसार, केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे हप्ता जमा होण्यात अडथळे येत आहेत. मात्र, रखडलेली रक्कम तातडीने जमा करावी, अशी ठाम मागणी महिलांनी केली आहे.

Comments are closed.