शिक्षक भरतीसाठी अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ला शनिवारी (दि. 7) सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी उमेदवारांचा उत्साह लक्षणीय दिसून आला.
नाशिक शहरातील 26 परीक्षा केंद्रांवर सुमारे 80 टक्के उपस्थिती नोंदवली गेली. पहिल्या दिवशी अंदाजे 10 हजार परीक्षार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
सीटीईटी परीक्षा आज, रविवारी (दि. 8) देखील दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. डी.एड., बी.एड. तसेच विविध अध्यापन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि सेवेत असलेल्या शिक्षकांसाठीही ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याने यंदा मोठ्या संख्येने उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) उमेदवारांना प्रवेशपत्रावरील परीक्षा तारीख, वेळ आणि केंद्राची माहिती काळजीपूर्वक तपासूनच केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, तसेच परीक्षा केंद्र, शहर किंवा तारखेत कोणताही बदल होणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे यापूर्वी केवळ एका दिवशी होणारी ही परीक्षा यंदा दोन दिवसांत घेण्याचा निर्णय CBSE ने घेतला आहे.

Comments are closed.