७ फेब्रुवारीला सीटीईटी आणि जिल्हा परिषद निवडणुका एकाच दिवशी; परीक्षार्थी व शिक्षक संभ्रमात! | CTET Exam and Elections on Same Day!

CTET Exam and Elections on Same Day!

केंद्र शासनाच्या वेळापत्रकानुसार ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) संपूर्ण देशभर आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले असून, राज्यातील मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थ्यांनी सीटीईटीसाठी अर्ज केले आहेत.

CTET Exam and Elections on Same Day!

मात्र, याच दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारी रोजी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्याने, सीटीईटी परीक्षार्थींमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना निवडणूक कामाचे आदेश देण्यात आले आहेत.

एकीकडे सीटीईटी परीक्षा देणे बंधनकारक, तर दुसरीकडे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून निवडणूक काम — या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये शिक्षक अडकले आहेत. परीक्षा द्यावी की निवडणूक कर्तव्य पार पाडावे, या संभ्रमामुळे शिक्षकांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे.

याच काळात इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा तसेच निवडणूक कर्तव्ये एकाच वेळी आल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही कामे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने, नेमके प्राधान्य कशाला द्यावे, हा प्रश्न गंभीर बनला आहे.

दरम्यान, स्थानिक निवडणुकांच्या तारखांमध्ये अचानक बदल झाल्यामुळे सीटीईटी परीक्षेला बसणाऱ्या शिक्षकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या विशेष परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, ७ व ८ फेब्रुवारी रोजी सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

— महेंद्र गणपुले,
माजी उपाध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ

Comments are closed.