केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) फेब्रुवारी २०२६ सत्राची उत्तरपत्रिका केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) अधिकृतपणे जाहीर केली आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची अपडेट असून आता सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रश्नपत्रिका आणि अधिकृत उत्तरांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ ctet.nic.in वर जाऊन आपला रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून उत्तरपत्रिका डाउनलोड करता येते.

उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर उमेदवारांना परीक्षेत किती प्रश्न बरोबर सोडवले याचा अंदाज घेता येईल. जर कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराबाबत उमेदवारांना शंका किंवा आक्षेप वाटत असेल, तर त्यांना १५ मार्च २०२६ पर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.
आक्षेप नोंदवताना उमेदवारांनी सर्वप्रथम संबंधित प्रश्न निवडावा लागेल आणि त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत नेमका काय आक्षेप आहे हे स्पष्टपणे नमूद करावे लागेल. तसेच आपला मुद्दा योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी संबंधित दस्तऐवज किंवा संदर्भ सामग्री अपलोड करावी लागेल. त्यानंतर निर्धारित शुल्क भरून आक्षेपाची नोंदणी पूर्ण करावी लागेल.
सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपांची तपासणी तज्ज्ञ समितीकडून केली जाईल. तपासणीनंतर एखाद्या प्रश्नाच्या उत्तरात त्रुटी आढळल्यास त्यामध्ये आवश्यक दुरुस्ती केली जाईल. त्यानंतर सुधारित अंतिम उत्तरपत्रिका (Final Answer Key) जाहीर करण्यात येणार आहे.
म्हणूनच CTET परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली उत्तरपत्रिका तपासून आवश्यक असल्यास वेळेत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.