पिंपरी-चिंचवड महापालिकेत तिन्ही अतिरिक्त आयुक्त आधीच कार्यरत असतानाच माेनिका ठाकुर यांची चौथ्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक झाल्याने प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे. महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी सोमवारी हा आदेश जारी केला.
महापालिकेत ‘ब’ वर्गातील तीन अतिरिक्त आयुक्त पदे मंजूर आहेत – त्यापैकी दोन प्रतिनियुक्तीवर आणि एक स्थानिक अधिकाऱ्यांकडून भरली जाते. राज्य सेवेतील प्रदीप जांभळे-पाटील, मुख्याधिकारी संवर्गातील विजयकुमार खोराटे आणि स्थानिक अधिकाऱ्यांतील तृप्ती सांडभोर या पदांवर कार्यरत आहेत.
जांभळे-पाटील यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ नुकताच संपला असला तरी अद्याप त्यांची बदली शासनाकडून निश्चित झालेली नाही. त्यानंतर ठाकूर यांची नेमणूक झाल्यामुळे प्रशासनात गोंधळ निर्माण झाला आहे. महसूल विभागाकडून आदेश जारी झाला असला तरी नगरविकास विभागाचा आदेश अद्याप येणे बाकी आहे.
दरम्यान, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली असून, त्यांची बदली नागपूरला करण्यात आली आहे. शिंदे यांचे करसंकलन आणि निवडणूक विभागातील कामकाज महत्त्वपूर्ण होते, त्यात प्रभागरचना आणि मतदारयादी तयार करण्याचे कामही त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते.

Comments are closed.