मुंबई महानगर क्षेत्रातील सरकारी कार्यालयांत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची सवलत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले की, महिला कर्मचाऱ्यांना आता ‘लवकर या-लवकर जा’ या धोरणाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे महिलांना कामाच्या वेळेत काही प्रमाणात लवचिकता मिळणार आहे.
या निर्णयानुसार महिला कर्मचारी सकाळी ९.१५ ते ९.४५ दरम्यान कार्यालयात लवकर उपस्थित राहिल्यास संध्याकाळी त्यांना सुमारे ३० मिनिटे आधी घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. गर्दीच्या वेळेत प्रवास करताना होणारी अडचण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची प्रसूती रजा दिली असून, प्रसूतीनंतर आवश्यक असल्यास एक वर्षापर्यंत अर्धपगारी रजा घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नसणार आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे. तसेच राज्यात चौथे महिला धोरण लागू करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
याशिवाय ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेतून २०१५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान ४२ हजारांहून अधिक हरवलेली मुले शोधण्यात आली आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, ‘अन्नपूर्णा’ आणि ‘लखपती दीदी’ यांसारख्या योजना राज्यात राबवल्या जात असल्याची माहितीही देण्यात आली.

Comments are closed.