राज्य सरकारनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकरभरतीत पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता या बँकांमधील भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. यासंदर्भात शासनानं नुकताच जीआर काढला असून, त्यामुळे राज्यभरातील सर्व जिल्हा बँकांच्या भरतीचा मार्ग खुला झाला आहे.
पूर्वी या भरती प्रक्रियेत अनियमितता, पैशांची देवाणघेवाण आणि आप्तपक्षपाताचे आरोप होत असत. या सर्वावर लगाम घालण्यासाठी सरकारनं डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही प्रक्रिया न्याय्य, पारदर्शक आणि पात्र उमेदवारांना न्याय देणारी ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे भरतीतील गैरव्यवहारांना आळा बसेल आणि खरे मेहनती उमेदवार पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले असून, ७० टक्के जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव असतील. उर्वरित ३० टक्के जागा बाहेरील उमेदवारांसाठी खुल्या राहतील. मात्र, बाहेरील उमेदवार उपलब्ध नसल्यास त्या जागा स्थानिकांकडून भरता येतील, असे शासनानं स्पष्ट केलं आहे.
ही प्रक्रिया आयबीपीएस, टीसीएस-आयऑन किंवा एमकेसीएल या संस्थांपैकी कोणत्याही एकाद्वारे राबविण्यात येईल. तसेच निवडलेली संस्था हे काम इतर कोणत्याही संस्थेकडे देऊ शकणार नाही, अशी अटही सरकारनं घातली आहे.

Comments are closed.