दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होण्याआधीच मोठा वाद निर्माण झाला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि परीक्षा काळात कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतल्याने मुख्याध्यापक महासंघाने तीव्र विरोध दर्शवला आहे. हे निर्णय मागे न घेतल्यास परीक्षा व्यवस्थापनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.

फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी-बारावी परीक्षांची तयारी मंडळाकडून सुरू असून, बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षा केंद्रांची निश्चितीही करण्यात आली आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी मंडळाने यंदा सर्व परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही सक्तीचे केले असून, त्याचबरोबर सर्व केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याच निर्णयांवरून मंडळ आणि मुख्याध्यापकांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत.
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाने मंडळाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे असतील तर प्रत्येक परीक्षा केंद्राला शासनाने अनुदान द्यावे. तसेच, कर्मचाऱ्यांच्या अदलाबदलीमुळे परीक्षा कालावधीत किमान एक महिना शाळा बंद राहण्याची शक्यता असून पेपर तपासणीमध्येही अडचणी येतील. हा निर्णय मुख्याध्यापक व शिक्षकांवर अविश्वास दर्शवणारा असल्याचा आरोप महासंघाने केला आहे.
निर्णय मागे न घेतल्यास परीक्षा व्यवस्थापन इतर यंत्रणेकडे सोपवावे आणि मुख्याध्यापक परीक्षा संचलनात सहभागी होणार नाहीत, असा स्पष्ट इशारा महासंघाने दिला आहे. या निवेदनावर महासंघाचे अनेक पदाधिकारी व सदस्यांच्या सह्या असून, त्यामुळे परीक्षा सुरू होण्याआधीच हा विषय राज्यभर चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
दरम्यान, शिक्षण मंडळाने 5 डिसेंबर रोजी जारी केलेल्या सूचनांनुसार प्रत्येक परीक्षा केंद्र व वर्गखोलीत सीसीटीव्ही, परीक्षा काळात कर्मचाऱ्यांची अदलाबदल, गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई, तसेच कॉपीमुक्त अभियानासाठी विद्यार्थी-पालक-जनतेला आवाहन करण्यासह एकूण 12 महत्त्वाच्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, परीक्षा सुरळीत पार पडणार की वाद अधिक गडद होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.