मोठा निर्णय! पहिली ते नववीची अंतिम परीक्षा २० एप्रिलपासून; २ मेपासून उन्हाळी सुट्टी, १५ जूनला शाळा सुरू! | Class 1–9 Exams From April 20; Schools June 15!

Class 1–9 Exams From April 20; Schools June 15!

राज्यातील जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा २० ते ३० एप्रिल दरम्यान होणार आहे. शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना किमान २२० दिवस अध्यापन मिळावे या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (एससीईआरटी) आणि शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. परीक्षेचा निकाल १ मे रोजी जाहीर केला जाईल आणि २ मेपासून विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळी सुट्टी मिळेल. दरवर्षीप्रमाणे १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळा पुन्हा सुरू होतील.

Class 1–9 Exams From April 20; Schools June 15!

दरवर्षी २८ सार्वजनिक सुट्ट्या, ५२ रविवार आणि ४४ दिवस उन्हाळी सुट्टी अशा एकूण सुमारे १२४ दिवस शाळा बंद असतात. त्यामुळे ३६५ दिवसांच्या शैक्षणिक वर्षात किमान २२० दिवस अध्यापन व्हावे यासाठी अंतिम परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्याचा निर्णय मागील वर्षापासून लागू करण्यात आला आहे. पूर्वी मार्चअखेर परीक्षा होत असल्याने एप्रिलपासून अनेक विद्यार्थी शाळेत येणे थांबवत होते.

दरम्यान, इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल (रविवारी) होणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील ४८,६९१ विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये चौथीचे ३१,४९४ आणि सातवीचे १७,१९७ विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील चौथीचे २१,२०२ आणि सातवीचे ५,४६७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा रविवारी असल्यामुळे अंतिम सत्र परीक्षेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय सीबीएसई पॅटर्नच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होते. त्या शाळांमध्ये पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा मार्चमध्ये घेतल्या जातात. त्यानंतर १ एप्रिलपासून शाळा सुरू होतात, तर १ मे ते १४ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी दिली जाते.

Comments are closed.