शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’; बाबुलनाथ मार्गाचा प्रश्नही मार्गी! | Chief Minister Baliraja Scheme and Babulnath Path!

Chief Minister Baliraja Scheme and Babulnath Path!

राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाणाऱ्या पाणंद रस्त्यांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ राबविण्यास मंजुरी दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानमंडळात ही घोषणा केली. या निर्णयाचे दोन्ही सभागृहांतील सदस्यांनी स्वागत केले असून, यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Chief Minister Baliraja Scheme and Babulnath Path!

या योजनेअंतर्गत बळीराजा शेतकरी यांच्यासाठी बारमाही, मजबूत आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पाणंद रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. गाव नकाशातील पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवली जाणार असून, त्यासाठी आवश्यक असलेली मोजणी तसेच पोलीस बंदोबस्ताची फी शासनाकडून पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. तसेच गाळ, माती, मुरूम, दगड यांसारख्या साहित्यांसाठी कोणतेही स्वामित्व शुल्क आकारले जाणार नसल्याचेही महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.

योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर देखरेख व अंमलबजावणी अधिक सुलभ होणार असून, शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईतील गिरगावजवळील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गिकेचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नही अखेर मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ‘बाबुलनाथ चॅरिटी ट्रस्ट’ला ही जागा केवळ एक रुपया या नाममात्र दरात ३० वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानमंडळात दिली.

मलबार-कंबाला हिल महसूल विभागातील ७१८.२३ चौ.मी. क्षेत्रफळापैकी १३५ चौ.मी. व्यावसायिक वापरासाठी वगळण्यात आले असून, उर्वरित ५८३.२३ चौ.मी. जागा मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या व मार्गिकेसाठी वापरली जात असल्याने भाडेपट्टा नूतनीकरणास मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत परिषदेत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला. शिवसेना (उबाठा) नेते सचिन अहीर यांनी हा तारांकित प्रश्न मांडला असता, मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर देण्याचे टाळल्याने आणि प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे कारण पुढे केल्याने सभागृहात विरोधकांकडून नारेबाजी करण्यात आली.

Comments are closed.